गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयातील बेड हाऊसफुल झाले होते. त्यामुळे जिथे बेड मिळेल तिथे रुग्णाला दाखल करण्याला रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाचा जीव वाचविण्याला प्राधान्य देत नॉन कोविड रुग्णालयात दाखल केले. पण नॉन कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांच्या यातना अजूनही कायम आहेत.
शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा निश्चित करून दिला आहे. यात कुठलीही अनियमितता हाेऊ नये यासाठी याचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केले जाते. यात काहीच गैर नाही. काळाबाजार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना स्वागतार्ह आहेत. मात्र यात नॉन कोविड रुग्णालयांना वगळणे म्हणजे या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना वाळीत टाकण्यासारखेच आहे. जिल्ह्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा भरपूर उपलब्ध आहे. कोरोनावरील गोळ्या औषधेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते खरेदेखील आहे. पण यानंतरही नॉन कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, ही वास्तविकता आहे. बऱ्याच रुग्णांच्या नातेवाईकांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय गाठून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा जेवढी मदत करता येईल तेवढी केली. खा. पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याला अडचणीच्या काळात एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देऊन प्रशासनाला सहकार्य केले. मात्र नॉन कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची समस्या कायम आहे. रविवारी रात्री १२ वाजता एका रुग्णाच्या नातेवाईकाने माजी आ. राजेंद्र जैन यांचे निवासस्थान गाठून आपबिती सांगून एकतरी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा पाठपुरावा करून व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इंजेक्शन मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रशासनाला अशा रुग्णांना सहकार्य करा असे सांगते. मात्र यानंतरही सहकार्य मिळत नसल्याची प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींनी बोलून दाखविली. प्रशासन जर एखाद्या रुग्णासाठी लोकप्रतिनिधींची विनंती ऐकत नसेल तर सर्वसामान्यांचे काय चालणार, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शासनानेसुद्धा परिस्थिती पाहता नियम शिथिल करून थोडे संवेदनशील होण्याची गरज आहे.
.........
कोट
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, अशात काही नॉन कोविड रुग्णालयेसुद्धा रुग्णांवर उपचार करून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे.
- राजेंद्र जैन, माजी आमदार
...........
कोरोनाच्या संकटामुळे अनेक जण हतबल आहेत. अनेकांची रुग्णांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्याची क्षमता नाही. तर बरेचदा शासकीय रुग्णालयातसुद्धा बेड मिळत नाही. अशावेळी त्यांना जिथे बेड मिळेल तिथे रुग्णाला दाखल करावे लागते. त्यामुळे अशा रुग्णालयात दाखल रुग्णांनासुद्धा सर्वच औषधोपचार व मदत मिळायला हवी.
- विनोद अग्रवाल, आमदार
.......
शासनाने कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयासाठी लावलेले नियम सध्याची परिस्थिती पाहता काही प्रमाणात शिथिल करण्याची गरज आहे. नॉन कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनासुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळायला हवे.
- दिलीप बन्सोड, माजी आमदार