लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेकडे डम्पिंग यार्ड नसल्याने शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून त्या कचऱ्याला कुणीतरी दररोज आग लावत असल्याने निघणाऱ्या धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण झाले आहे. अशात आता जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी गणेशनगरवासीयांनी केली आहे.शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे. परिणामी राणी सती मंदिर, बालाजी मंदिर, स्टेट बँक कॉलनी, सेल्सटॅक्स कॉलनी, गौरीनगर, सर्कस मैदान, बिडवाईकर चॉल, सुबोध चौक, अशोक कॉलनी यांसह अन्य परिसरातील नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. कचऱ्यात असलेल्या कपडे, प्लॉस्टिक, चामडे यांसह अन्य रासायनिक वस्तूंपासून तयार झालेला हा धूर विषारी असतो. अशा विषारी धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण होत आहे. यामुळे मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद करून कचऱ्याला आग लावणाऱ्याला पकडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
गणेशनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात- सध्या दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असून, दिल्लीत लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलले जात आहे. अशाच परिस्थितीत गणेशनगरवासी जगत असून धुरामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विविध प्रकारच्या वस्तूंपासून निघणारा किती विषारी असणार यावरून आता गणेशनगरवासी चांगलेच संतप्त आहेत. यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळीचा त्रास वाढला- एरवी निघणारा धूर हवेतून उडून जातो. मात्र, हिवाळ्यात धुक्यामुळे हवेतच असतो व त्यामुळे त्रास अधिकच वाढतो. त्यात गणेशनगर परिसरातील नागरिकांकडून खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळ आदी समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा व शहर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
१०० वर्षांनंतर घनकचरा प्रकल्प नाही- गोंदिया नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्षांचा काळ लोटला असूनही आतापर्यंत नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. शोकांतिका म्हणजे प्रकल्प तर सोडाच, प्रकल्पासाठी आतापर्यंत जागा मिळविण्यातही नगर परिषदेला यश आलेले नाही. मध्यंतरी ग्राम सोनपुरी येथे जागा घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने ही जागादेखील आता हातून गेल्यातच आहे. अशात आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही तरी पावले उचलण्याची गरज आहे.