रोपवाटिका २,७८४ हेक्टरमध्ये : रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र ७,७६० हेक्टर गोंदिया : खरिपाच्या हंगामात राहिलेली कसर भरून काढण्यासाठी रबी हंगामात पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कटाक्ष असतो. तसेच उन्हाळी धानपिकांचे भरपूर उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. आता नुकतेच जिल्ह्यात उन्हाळी धानपिकांच्या रोवणीला सुरूवात झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत ०.१९ टक्के रोवणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात उन्हाळी धानपिकाच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ७६० हेक्टर असून रोवणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ही रोवणी २० हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यतासुद्धा जिल्हा कृषी विभागाने वर्तविली आहे. एकंदरीत आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ५१२ हेक्टरमध्ये रोवणी झालेली आहे. जिल्ह्यात रोवणीचे कार्य सुरूच असून २८ फेब्रुवारीपर्यंत रोवणीचे कार्य सुरू राहणार आहेत. तसेच काही शेतकऱ्यांचे रोवणीची कामे मार्च महिन्यापर्यंत सुरू असतात. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन हजार ७८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्या आहेत. उन्हाळी धानपिकाची नर्सरी चांगली उगवली असली तरी आतापर्यंत रोवणीला वेग आलेला नाही. मात्र यावर्षी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्याचा फायदा उन्हाळी धानपिकाला होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. (प्रतिनिधी)
उन्हाळी भातपिकाची रोवणी ०.१९ टक्के
By admin | Published: February 08, 2017 12:58 AM