लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एका स्वस्त धान्य दुकानाला निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा करण्यात आल्याची बाब दहा दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. मात्र या प्रकरणात पुरवठादार आणि पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यावर थातूरमातूर कारवाई करुन सोडण्यात आले. गडचिरोली आणि नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर निकृष्ट तांदळाच्या पुरवठा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निलबंनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अशीच कारवाई गोंदिया जिल्ह्यात होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन धानाची भरडाई करुन सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर याच तांदळाचा जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाच्या निदेर्शानुसार स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. केवळ जिल्हात नव्हे तर महाराष्ट्रात इतरत्र सुध्दा हा तांदूळ पाठविला जातो. याच नियमानुसार जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना तांदळाचा पुरवठा केला. दरम्यान नवेगावबांध येथील एका स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा करण्यात आलेला तांदूळ अंत्यत निकृष्ट दर्जाचा आढळला. शिधापत्रिकाधारकांनी याची तक्रार स्थानिक सरपंचाकडे केली. त्यांनी याप्रकरणाची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यात साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे संबंधित पुरवठा निरीक्षकाने सांगितले. तर या तांदळाचा पुरवठा गोंदिया जिल्ह्यातील एका बड्या राईस मिलर्सने केला होता. मात्र याप्रकरणी केवळ पुरवठा करणाºया राईस मिलर्सला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आले. तर तांदळाचा गुणवत्ता लॉट तपासणी करणाºया गुणवत्ता निरीक्षकावर थातूरमातूर कारवाई करण्यात आली. मात्र ज्या लॉटचा तांदूळ निकृष्ट निघाला तो संपूर्ण लॉट तपासणी करण्यात आला नाही, पुन्हा किती स्वस्त धान्य दुकानांना या तांदळाचा पुरवठा करण्यात आला याची चौकशी करण्यात आली नाही. तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या तांदळाचे लॉट गुणवत्ता निरीक्षकाने कसे पास केले. सदर राईस मिलर्सकडून किती टन सीएमआर तांदूळ जमा करण्यात आला. या सर्व गोष्टीची चाचपणी व सखोल चौकशी करण्याची गरज होती. मात्र केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन या प्रकरणावर पांघरुन घालण्यात आले. गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात सुध्दा हाच प्रकार घडल्याने तेथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर निलबंनाची कारवाईचे आदेश शुक्रवारी देण्यात आले. त्यामुळे अशीच सखोल चौकशी करुन जिल्हातील संबंधित दोषी अधिकाºयांवर कारवाई होणार का असा उपस्थित केला जात आहे.
काळ्या यादीतील राईस मिलर्सशी भरडाईचा करारशासकीय धान खरेदी केंद्रावरील खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करुन शासनाकडे तांदूळ जमा करण्यासाठी दरवर्षी जिल्हा पुरवठा विभागाकडून राईस मिलर्सशी करार केले जातात. मागील वर्षी तर चक्क बंद राईस मिल असलेल्या दोन राईस मिलर्सशी भरडाईचा करार करण्यात आला होता. तर यंदा सुध्दा काळ्या यादीत समावेश असलेल्या एका राईस मिलर्सशी तांदळाच्या भरडाईचा करार करण्यात आल्याची माहिती आहे. धानाच्या भरडाईला घेवून दरवर्षी नवीन प्रकार समोर येत असून यातील नेमके गौडबंगाल समोर आणण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे यासर्व प्रकाराची सखोल चौकशी केल्यास बडे मासे गळाला लागू शकतात. तसेच कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पुढे येऊ शकतो.गुणवत्तेची तपासणी तर लॉट निकृष्ट कसाराईस मिलर्सकडून धानाची भरडाई करुन तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. जो धान भरडाईसाठी दिला होता त्याच धानाची भरडाई करुन तांदूळ जमा करण्यात आला की नाही, तांदळाचा दर्जा चांगला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी गुणवत्ता निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यानंतरही निकृष्ट तांदळाचे लॉट पास केले जात असतील तर दाल मे कुछ काला जरुरु है, त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.