लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : काही दिवसांपूर्वी गोविंदपूर परिसरातील भागात दुर्गंधयुक्त गढूळ पाणी नळातून येत असतानाच आता तोच प्रकार सिव्हिल लाइन्स परिसरातील सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडत आहे. येथील नळातून दुर्गंधयुक्त गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील १० दिवसांपासून हा प्रकार सुरू असून अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
गोंदिया शहर व लगतच्या ग्राम कुडवा व कटंगी यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्यापासून मजीप्राच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कधी वीज पुरवठा खंडित होणे, कधी पाइपलाइन फुटणे तर कधी मोटार पंप नादुरुस्त होणे अशा नानाविध कारणांमुळे पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दूषित पाण्यापासून सर्वाधिक आजार होत असल्यामुळे नागरिक घरी नळ घेतात मात्र नळाला पाणीच येत नसल्याने त्यांची अडचण होते. हाच प्रकार मजीप्राकडून पाणी पुरवठा वारंवार पाणी पुरवठा खंडित करून केला जात आहे.
अशातच आता शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील सुभाष बाग समोरील सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडत आहे. मागील १० दिवसांपासून वसाहतीत दुर्गंधयुक्त गढूळ पाणी नळाला येत आहे. पाण्याचा इतका घाण वास येत आहे की, तेथील नागरिकांना ते पाणी पिणे अशक्य झाले आहे. परिणामी येथील नागरिकांना बोअरवेलच्या पाण्यावर वेळ मारून न्यावी लागत आहे.
तक्रार करूनही काहीच फायदा नाही घडत असलेल्या प्रकारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप विभागाकडून कुणीही पाहणी करण्यासाठी गेलेला नाही. आरोग्य विभागाकडून शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र मजीप्राकडून शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची अडचण होत असून ते दूषित पाणी पिल्यास मात्र आजारांना बळी पडावे लागणार आहे. अशात मजीप्राने गांभीर्याने घेऊन लगेच उपाययोजना करावी अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.
गढूळ पाण्याची समस्या नित्याचीच शहरात कोणत्या कोणत्या भागात गढूळ व दुर्गंधयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची समस्या आता नित्याचीच झाली आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदपूर परिसरात हीच समस्या उद्भवली होती. आता सिव्हील लाईन्स परिसरात तोच प्रकार घडताना दिसत आहे. यावर मजिप्राने कायम तोडगा काढण्याची गरज आहे.