गोंदिया : जिल्ह्यात कोरोना कहरामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. अशात रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढत असून, अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांचा खासगी रुग्णालयांत तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा यांनी ५ मेडिकल स्टोर्स-एजंसीला खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ७०० वर जात आहे. अशात शासकीय रुग्णालय आता फुल्ल होत असून, खासगी रुग्णालयांत रुग्ण उपचारासाठी जात आहेत; मात्र खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता मृतांची आकडेवारीही वाढत आहे. यामुळे जिल्हावासीयांत आता दहशत निर्माण झाली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याची ही बाब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा यांच्या निदर्शनास आणून दिली.
याची लगेच दखल घेत जिल्हाधिकारी मीणा यांनी ५ मेडिकल स्टोर्स-एसंजीला खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच खासगी रुग्णालयांनाही रुग्णांच्या उपचारार्थ नमूद मेडिकल स्टोर्स-एजंसीमधूनच रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्यास आदेशित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१२) हे आदेश काढले असून, त्यांच्या या आदेशानंतर नक्कीच चांगले परिणाम समोर येतील, यात शंका वाटत नाही.
------------------------------
खासगी रुग्णालयांशिवाय विक्री करता येणार नाही
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात मेडिकल स्टोर्स-एजंसीला कोरोना उपचारासाठी परवानगी असलेल्या १० खासगी हॉस्पिटल्सलाच आवश्यकतेनुसार रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे आदेशित केले आहे. विशेष म्हणजे, याशिवाय त्यांना इंजेक्शनची विक्री करता येणार नाही, असेही नमूद आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळून त्यांच्यावर वेळीच उपचार होणार असल्याचे दिसते.