अर्जुनी मोरगाव : अंगणवाडी बालकांना दिला जाणारा तांदूळ निकृष्ट व सडका आहे. पुरवठादार हे चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. विशेष म्हणजे या तांदळाच्या वेष्टनावर बॅच क्रमांक व ते केव्हा सीलबंद करण्यात आले त्याचा दिनांक नमूद नसल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सोमवारी (दि.२१) त्या तांदळाचा पंचनामा करून तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वयोगटातील बालकांना शासनाकडून सकस आहार पुरवठा केला जातो. कोरोना संक्रमणाच्या काळात अंगणवाडी केंद्र बंद आहेत. त्यामुळे बालकांना केंद्रात थेट आहार न देता तांदळाचे सीलबंद पॅकेट दिले जात आहेत. ग्राम जानवा येथे होमदास ब्राह्मणकर या सुज्ञ पालकाच्या हातात हे पॅकेट पडले. त्याने ते उघडताच दुर्गंधी व आतमध्ये सडका तांदूळ आढळून आला. या तांदळाला अळ्यासुध्दा लागलेल्या आहेत. त्यांनी सोमवारी हे पॅकेट व सडका तांदूळ घेऊन स्थानिक एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय गाठले. बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे यांची भेट घेऊन त्यांना तो तांदूळ दाखविला. लगेच त्यांनी तांदळाचा पंचनामा करून हा तांदूळ वितरण करण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या. तांदळाचे नमुने सीलबंद करून नागपूरच्या विभागीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले. इतर वेळात कणीयुक्त डाळीचा पुरवठा होत असल्याचेही ब्राह्मणकर यांनी सांगितले. सकस आहाराच्या नावाखाली चक्क निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य पुरविले जाते असल्याचाही आरोप त्यांनी केला.
...........
‘आंधळा दळतो अन् कुत्रा पीठ खातो’चा प्रकार
या तांदळाचा पुरवठा मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑप. उपभोक्ता महासंघातर्फे करण्यात आला आहे. तांदळाचे हे पॅकेट १९०० ग्रॅम वजनाचे आहे. या वेष्टनावर बॅच नंबर व सीलबंद केल्याचा दिनांक नमूद नाही. मात्र याच वेष्टनावर पॅकेजिंग केल्याच्या तारखेपासून चार महिने वैध राहील, अशी सूचना करण्यात आली आहे. जेव्हा की तारीखच नमूद नाही तर चार महिने कुठून सुरू करायचे हा भेडसावणारा प्रश्न आहे. नियमाप्रमाणे बॅच नंबर व सीलबंद केल्याचा तारीख असणे बंधनकारक आहे. मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. एकंदरीत या विभागात ‘आंधळा दळतो अन कुत्रा पीठ खातो’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
..........
गुन्हा दाखल करा : शिवसेनेची मागणी
निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करून पुरवठादार हा चिमुकल्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ करत आहे. तांदळाला दुर्गंधी येत असून सडका व अळ्या लागल्या आहेत. या पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचे आहाराचे देयक त्वरित थांबविण्यात यावे. अन्यथा तालुका शिवसेनेतर्फे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, संजय पवार, होमदास ब्राह्मणकर, प्रकाश उईके व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
210621\20210621_125658.jpg
===Caption===
निकृष्ट दर्जाचा तांदूळ व बॅच नंबर गायब असलेले वेष्टन