गोंदिया : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे गोंदिया तालुक्यातील मौजा कनारटोला येथील सीमा संतोष मडावी यांचे राहते काेसळले. त्यामुळे निवाऱ्याअभावी राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. डोक्यावरच छप्पर नसल्याने त्या निराधार झाल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत करीत त्यांना आधार दिला.
सीमा मडावी ह्या आपल्या एका बाळासोबत याच घरात एकट्याच राहत होत्या. त्यामुळे आता त्यांच्या सामोर आयुष्य जगण्याचे आव्हानसुद्धा आहे. त्यांचे राहते घर पावसामुळे पडल्याने शासकीय मदतीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासमोर आपली समस्या मांडली. खवले यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष देऊन तत्काळ आवश्यक शासकीय योजनेचा लाभ निराधार झालेल्या सीमा मडावी यांना देण्याचे निर्देश अपर तहसीलदार खळतकर यांना दिले.
वर्तमान परिस्थितीला तोंड देण्यासाठी व झालेल्या नुकसानीसाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गोळा केलेल्या ५ हजार रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या हस्ते निराधार सीमा मडावी यांना देण्यात आली. एवढेच नाही तर शासनातर्फे योग्य मदत देण्याचे आश्वासनसुद्धा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिले. यावेळी अनुसया नागपुरे, मंजू खोब्रागडे, आकाश चव्हाण, किशोर राठोड, मिलिंद बुंदेले, राजकुमार भाजीपाले व इतर कर्मचारी उपस्थित होते.