आमगाव : महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया अंतर्गत स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्र, आमगाव अंतर्गत बचत गटातील शेतकरी महिलांना भाजीपाला लागवड करण्याकरिता हायब्रीडचे बियाणे, खत व कीटकनाशक मोफत देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बायर इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड - १९ रिस्पॉन्स प्रकल्पांतर्गत जीआयझेड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९च्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र, आमगावच्या बचत गटातील २०० शेतकरी महिलांना वांगी, टोमॅटो, टरबूज याचे प्रति शेतकरी १ एकर करिता २,१२,७८० रुपयांचे बियाणे मोफत देण्यात आले. या बियाण्यापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून २० मार्च रोजी या शेतकऱ्यांना मोफत ६,९५,९०० रुपयांचे कीटकनाशक व खत वाटप करण्यात आले. बायर कंपनीचे राजेश बोपचे यांनी कीटकनाशक कसे वापरायचे, कोणत्या रोगावर कोणते औषध उपयोगी आहे, याचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदियाचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, हेमंत मेश्राम, आशा दखने, पुस्तकला खैरे, संगीता बोरकर उपस्थित होते. रुपाली कटरे, संध्या पटले, शोभा तावडे, दीपा साखरे, सविता बेनदवार यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.