गोंदिया : २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला आता एक महिना होत असूनही संप सुटण्याचे काहीच चिन्ह सध्या तरी दिसून येत नाही.
महामंडळाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले; मात्र त्यानंतरही ते आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मात्र प्रवाशांचे हाल होत असून, या संपाच्या काळातच दिवाळीचा सण आला व प्रवाशांची चांगलीच फसगत झाली.
शासनाने सर्व प्रयत्न करून बघितले; मात्र कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नसल्याने शासनाने आता खासगी प्रवासी वाहनांना परवानगी दिली असून, काही ठिकाणी खासगी शिवशाही रस्त्यावर उतरविल्या आहेत; मात्र जिल्ह्यात फक्त बालाघाटसाठी अनेक खासगी बसेस चालत आहेत. तर अन्य मार्गांवर मात्र मोजक्याच बसेस धावत असल्याची माहिती आहे. यामुळे येथील प्रवाशांना आता काळी-पिवळी, ऑटो तसेच धावत असलेल्या १-२ बसेसचाच आधार आहे.
मोजक्याच खासगी बसेस
लगतच्या बालाघाट राज्यातील खासगी ट्रांसपोर्टवाल्यांच्या बसेस जिल्ह्यात सध्या धावत आहेत; मात्र त्या फक्त गोंदिया-बालागाट धावतात. याशिवाय शहरातील काही खासगी ट्रांसपोर्टवाल्यांची एखादी बस नागपूरसाठी धावते. त्यातही त्यांची अन्यत्र बुकींग असल्यास ते चालवित नाही, अशी माहिती आहे. यामुळे नागपूरहून येणाऱ्या बसेस प्रवासी घेऊन परत जातात, असे सुरू आहे.
३) प्रवाशांची अडचण
दिवाळी नुकतीच झाली असून, ग्रामीण भागात मंडईची धूम सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाहुण्यांचे आवागमन सुरू आहे. अशात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे. यावर तोडगा निघाला पाहिजे.
- रमेश ठाकरे
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. आताही संप सुरू असून, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे; मात्र त्यातही गैरसोय होतेच. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय बघता संपावर तोडगा काढून सेवा पूर्ववत करावी.
-योगेश खोटेले
येथेही संप सुरू असल्यामुळे प्रवाशांना काळी-पिवळी, ऑटोसारख्या प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, तसेच मधामधात काही खासगी बसेसही दिसून येतात; मात्र प्रवाशांची गैरसोय आहेच.
- संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया.