गोरेगाव : तालुक्यातील खाडीपार येथे शनिवार एकात्मिक आदिवासी विकास विभाग देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आईवडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या दोन मुलींच्या कुटुंबाला भेट दिली. त्यांनी दोन्ही चिमुकल्यांच्या नावे दीड लाख रुपयांची ठेव, अन्नधान्ये, मुलांकरिता खाऊ, कपडे त्यांच्या आजीच्या स्वाधीन करून कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या पाठीशी आदिवासी विकास विभाग ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
खाडीपार येथील दोन चिमुकल्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही चिमुकल्यांची जबाबदारी त्यांच्या ८० वर्षीय वृध्द आजीवर आली. याची माहिती आदिवासी विकास विभागातील शिक्षक शैलेश नंदेश्वर यांनी या कुटुंबाची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी रमा मिश्रा (दुबे) यांना दिली. विभागातील या दोन कर्मचारी, अधिकारी यांनी देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्यापुढे सदर कुटुंबाची इत्यंभूत माहिती देऊन त्यांना मदतीची अत्याधिक गरज असल्याचे सांगितले. या कुटुंबातील ८० वर्षाची आजी दोन मुलींचा सांभाळ कशी करत असेल ही बाब प्रकल्प अधिकारी राचेलवार यांनी हेरली व तातडीने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, आदिवासी विभागातील शासकीय वसतिगृहे, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना निराधार कुटुंबाला मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन वसतिगृहातील गृहपाल, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व कर्मचारी यांच्यासह संस्थाचालक मंडळ, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी देणगी जमा केली. आठवडाभरात दीड लाख रुपये गोळा करून निराधार मुलींच्या नावे विदर्भ कोकण ग्रामीण बँक कुऱ्हाडी येथे १० वर्षाकरिता मुदत ठेवी म्हणून जमा केले. यामुळे या दोन चिमुकल्यांना आधार होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्थासुध्दा मदतीसाठी पुढे येत आहेत.