७ ते ९ तारखेदरम्यान सर्वेक्षण : गोंदिया शहरातील स्वच्छतेची होणार पडताळणी कपिल केकत गोंदिया शहरातील स्वच्छता विषयक काय सोई उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी १७ ते १९ जानेवारी दरम्यान शहरात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यासाठी आता विभागाचे पथक पुन्हा ७ ते ९ या कलावधीत शहरात सर्वेक्षण करणार आहेत. यात मागील सर्वेक्षणातील ठिकाणांची पाहणी करून ते त्याची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच स्वच्छता सर्वेक्षण हा नवा प्रयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हा प्रयोग केला जाणार असून यांतर्गत राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा असून यात गोंदिया शहराचीही निवड करण्यात आली आहे. यांतर्गत १७ ते १९ जानेवारी दरम्यान गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून शहरात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी विभागाचे कमलेश मिशाद व अंजन यादव शहरात आले होते. या सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेकडून माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे पथकातील मिशाद यांनी शहरातील शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया, अंगूर बगिचा व मोक्षधाम परिसरातील रस्ते व स्वच्छतेची पाहणी केली होती. तर यादव यांनी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रश्नावलीत नोंद घेऊन त्या संबंधीचे पुरावे नगर परिषदेकडून घेतले होते. दोघांनी या सर्वेक्षणाचा अहवाल विभागाकडे जमा करावयाचा होता व येथे त्यांचे काम संपले होते. मात्र या दोघांनी केलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यासाठी आता विभागाचे विशेष पथक ७ ते ९ तारखेदरम्यान गोंदियात येणार असल्याची माहिती आहे. या पडताळणी सर्वेक्षणात ते मागील पथकाने केलेल्या सर्वेक्षणातील ठिकाणांची पाहणी करणार असून आहे ती स्थिती जाणून घेणार आहेत. तर आता या पथकाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावरून शहराची रॅकींग होणार असल्याचेही कळले.
सर्व्हेक्षणाच्या पडताळणीसाठी पथकाची ‘सरप्राईज व्हिजीट’
By admin | Published: February 08, 2017 12:56 AM