एसटी महामंडळ : सडक-अर्जुनी येथील निवारा जागेअभावी रखडलागोंदिया : ‘गाव तिथे बस’ या उक्तीनुसार राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात प्रवासासाठी बसेसची सोय उपलब्ध करून देते. बस थांब्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ व लोकप्रतिनिधी फंडातून ठिकठिकाणी प्रवाशी निवारे बांधण्यात आले. मात्र या निवाऱ्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे तर काही ठिकाणची प्रवाशी निवारे दयनिय स्थितीत आहेत. या निवाऱ्यांचे सर्वे करून दुरूस्ती करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक नागुलवार यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी येथील बस स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. तर आमगाव येथील निवाऱ्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मात्र सडक-अर्जुनी सोडला तर इतर कोणत्याही ठिकाणी नवीन प्रवासी निवाऱ्यांचे काम प्रस्तावित नाहीत. तरी कोणत्या ठिकाणी प्रवासी निवाऱ्यांची गरज आहे, कोणत्या ठिकाणी प्रवासी निवाऱ्यांची स्थिती कशी आहे, हे तपासण्यासाठी त्यांचे सर्वे करण्यात येणार आहे. सर्वेचा अहवाल आल्यानंतर तशी कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.सडक-अर्जुनी हे तालुक्याचे स्थळ असतानाही व पालकमंत्र्यांचे स्वगाव असतानाही येथे अनेक वर्षांपासून प्रवासी निवाराच नाही. येथील प्रवासी पानटपऱ्यांवर किंवा वृक्षाच्या खाली बसून बसची वाट बघतात. मात्र प्रवासी निवारा अद्यापही तेथे बनविण्यात आला नाही. याबाबत विभाग नियंत्रक नागुलवार यांचा विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, सडक-अर्जुनी येथे प्रवासी निवारा तयार करण्याचा प्रस्ताव आला होता. तो आम्ही वरच्या कार्यालयास सादर केला. सर्वकाही ठिक आहे. केवळ जागेचा प्रश्न आहे. सडक-अर्जुनीच्या नगर पंचायतने जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे त्वरित प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात येईल. मात्र जागेच्या अभावाने तेथील काम रखडले आहे. जागा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या एक-दोन दिवसात आम्ही तसे पत्र तेथील नगर पंचायतला पाठविणार आहोत. नगर पंचायतने जागा उपलब्ध करून दिल्यास त्वरित प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम तेथे सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
प्रवासी निवाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी सर्वेक्षण
By admin | Published: March 03, 2017 1:23 AM