तिरोडा : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करणे, डॉक्टरांनी दिसलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी दिले.
तिरोडा उपविभागिय अधिकारी अजय नाष्टे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेझरी अंतर्गत येणारे नवेझरी, सोनेखारी, कुल्पा, सितेपार, खेडेपार या गावातील कोरोना रुग्णांचा आढावा रविवारी घेतला, तसेच या गावांमध्ये किती नागरिकांचे लसीकरण झाले, यांची माहिती घेतली. यावेळी आ. विजय रहांगडाले हेसुद्धा उपस्थित होते. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून ताप, सर्दी,ऑक्सिजन लेव्हल मोजून नोंदणी करण्याचा उपक्रम राबवावा. त्यामुळे गावाची परिस्थिती कळण्यास मदत होईल, असे आ. रहांगडाले यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी नाष्टे यांनी जे दोन टक्के नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे व लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंड किंवा गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या. यावेळी ग्राममंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर, उपाध्यक्ष प्रभुदास ऊके, पोलीस पाटील प्रकाश भांडारकर, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष भास्कर बावनथडे, अजय भांडरकर, प्रमोद मंदुरकर, राजू नांदगावे, ग्रामसेवक एम.बी.मेश्राम उपस्थित होते.