इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम खामखुरा येथील पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांची सखोल चौकशी करून निलंबित करण्याची मागणी गिरिधारी साखरे व इतर नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे ७ एप्रिल रोजी निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात, पोलीस पाटील जयप्रकाश लाडे हे राजकारण करीत असून निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होतात. तसेच एखाद्या विशिष्ट व्यक्तीस किंवा पक्षाला मत देण्याविषयी आग्रह करतात. खामखुरा येथे दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून ज्यांच्याशी वैर आहे त्या दारू विक्रेत्यांना पकडून देतात व त्यांचीच तक्रार करतात. ग्रामस्थांना लागणारे दाखले वेळेवर देत नसून अडवणूक करतात. स्वतः घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. शासनाच्या रमाई आवास योजनेतून सन २०१७-१८ मध्ये घरकुल मंजूर झाले मात्र अजूनपर्यंत बांधकाम केलेच नाही व दबाव तंत्राचा वापर करून ६० हजार रुपये हडपले आहे.
तसेच ५ वर्षांपूर्वी शासनाच्या बैलजोडी योजनेचा लाभ घेतला. परंतु अधिकारी व इतरांना विश्वासात घेऊन बैलजोडी विकत न घेता पैशाची उचल केली आहे. तसेच गावकऱ्यांना दाखल्यासाठी नेहमी त्रास देतात व वेळेवर दाखले देत नसल्याने गावकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास उशीर होतो. तर कधी लाभ सुद्धा मिळत नसल्याचे नमूद आहे. करिता पोलीस पाटील लाडे यांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी गिरिधारी साखरे व इतर २५ नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व आमदार चंद्रिकापुरे यांना निवेदनातून केली आहे. तर पोलीस पाटील लाडे यांना याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. घरकुल बांधकामाकरिता साहित्य आणून ठेवलेले आहे मात्र कोरोेना प्रादुर्भावामुळे घरकुल बांधकाम वेळेवर करता आले नाही असे त्यांनी सांगितले.