लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संपाला घेऊन ठाम असतानाच आता महामंडळाकडून संपात असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील प्रत्येकी १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे आता या संपाला घेऊन कर्मचारी गटातून काय प्रतिसाद दिला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत. ऐन सणासुदीत करण्यात आलेल्या या संपामुळे नागरिकांची अडचण होत असल्याने उच्च न्यायालयानेही संप मागे घ्यावा, असे सांगितले होते, तर सोमवारी (दि.८) कर्मचारी प्रतिनिधी, शासन प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चनंतर उच्च न्यायालयाने १२ आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करणार असेही स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही कर्मचारी मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार, असा पवित्रा घेऊन आहेत. अशात महामंडळाने मंगळवारी (दि.९) संपात सहभागी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, गोंदिया आगारातील १० तर तिरोडा आगारातील १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत रोष - महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष वाढला आहे. एकीकडे मागणी पूर्ण न करता कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे चुकीचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यानंतरही संप सुरूच राहणार, यावर कर्मचारी अडून आहेत.