वृद्धा झाली बेशुद्ध : उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील बाघोली येथील आठ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून मग्रारोहयो अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कामासंदर्भात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या आत्मदहनाला सभापती पी.जी. कटरे व निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. पांदन रस्ता कामाविषयी अनेक तक्रारी देऊन ११ महिन्यात कारवाई न झाल्यामुळे २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे शेतकरी आत्मदहन स्थळी पोहोचले व भर उन्हात बसून न्यायाची मागणी करीत होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी शेतकऱ्यांशी व सभापती पी.जी. कटरे यांच्याशी चर्चा करुन कडक कार्यवाही करण्याचे लेखी आदेश काढल्याने त्या शेतकऱ्यांच्या आत्मदहनाला स्थगिती दिली.बघोलीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन २० मे रोजी करण्याचा इशारा दिला होता. त्यात रुपचंद पटले, दसाराम पटले, मयंक चन्ने, नारायण चन्ने व जायाबाई सोनवाने यांचा समावेश होता. भर उन्हात बसल्यामुळे ६७ वर्षाच्या जाया सोनवाने बेशुद्ध होताच प्रशासन हलले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहीते, रोहयो उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, खंडविकास अधिकारी हरिणखेडे उपस्थित होते. सर्व कागदपत्रांची चौकशी करुन संबंधित पांदन रस्ता प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी दिले.
त्या शेतकऱ्यांची आत्मदहनाला स्थगिती
By admin | Published: May 21, 2017 1:45 AM