गोंदिया : नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यात रविवारी (दि. २२) टी-९ वाघाचा झुंजीत मृत्यू झाला, तर सोमवारी याच प्रकल्पातील थाडेझरी कक्ष क्रमांक ९९ मध्ये टी-४ वाघिणीच्या दोन वर्षीय बछड्याचा मृतदेह कुजलेल्या लेल्या अवस्थेत आढळला. बछड्याच्या मृतदेहावर जखमा असल्याने त्याची शिकार करण्याचा तर प्रयत्न झाला नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या थाडेझरी परिसरात सोमवारी (दि. २३) सकाळी वन्यजीव विभागाचे कर्मचारी गस्त घालीत होते. या दरम्यान त्यांना कक्ष क्रमांक ९९ मधून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांना शंका आल्याने त्यांनी या परिसराची पाहणी केली. यादरम्यान एक नर बछडा मृतावस्थेत आढळला. या बछड्याचा अर्धा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचा दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अंदाज वर्तविला जात आहे.
गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांना दिली. माहिती मिळताच गौडा व उपसंचालक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक एम. एस. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळाची पाहणी केली. समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, रूपेश निंबरते, छत्रपाल चौधरी यांचा समावेश होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल वानखेडे, डॉ. सौरभ कबते, डॉ. समीर शेंदरे, डॉ. उज्ज्वल बावनथडे यांच्या चमूने वाघाचे शवविच्छेदन केले. यानंतर जंगलात बछड्याचा दफनविधी करण्यात आला. मृत बछड्याच्या शरीरावर जखमा आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाची चमू त्या दिशेने तपास करीत आहे.
टी-४ वाघिणीच्या बछड्यांनी घातली होती भुरळ
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-४ वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली होती. वाघिणीचा परिवार पाहण्यासाठी पर्यटक या प्रकल्पाला भेट देत होते. सोशल माध्यमांवरदेखील या टी-४ वाघीण आणि तिच्या बछड्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
घातपात की आणखी काहीपशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे समिती सदस्यांच्या उपस्थितीत मृत बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. व्हिसेरा नमुने उत्तरीय तपासणीकरिता संकलित करण्यात आले आहेत. बछड्याच्या शरीरावर जखमा आढळल्याने घातपात की आणखी काही अशी शंका वर्तविली जात आहे.