साखरीटोला : आमगाव - देवरी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या साखरीटोला परिसरात मागील काही महिन्यांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. मात्र, याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसरात प्रत्येक गावात झोलाछाप डॉक्टर घरोघरी जाऊन औषधोपचार करीत आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी साखरीटोला येथे घडला आहे. एका बोगस डॉक्टरने तरुणीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर काही वेळात त्या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी बोगस डॉक्टर विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरांकडे डिप्लोमा किंवा डिग्री नसताना इंजेक्शन देतातच, शिवाय शस्त्रक्रियासुध्दा ते करतात. बरेचदा रुग्णदेखील बरे होतात. त्यामुळे ते बोगस डॉक्टरांच्या उपचाराला बळी पडतात. मात्र, रुग्णांनी अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याची गरज आहे. मान्यताप्राप्त डॉक्टर अथवा शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. आरोग्य विभागाने तालुक्यात बोगस डॉक्टरांविरूध्द शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.