कपिल केकत
गोंदिया : लसीकरण केंद्रांची संख्या घटल्याने आता नागरिक लसीकरणाकडे कानाडोळा करीत असून, अशातच नागरिक आता लस घेण्यास टाळत आहेत. परिणामी लसीकरणाची आकडेवारी सातत्याने घटत चालली आहे. शिवाय, जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा असतानाच आता सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाही लसीकरणावर परिणाम होत आहे.
जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे. कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, यामुळेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. केंद्रे कमी झाल्याने नागरिकांना आता शहरात सुरू असलेल्या मोजक्याच केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गर्दी वाढत असल्याने एवढी धावपळ करण्यापेक्षा नागरिक लस घेण्याकडे कानाडोळा करीत आहेत. हेच कारण आहे की, दररोज ५०००-६००० पर्यंत लसीकरणाचा आकडा सोमवारी ६५० वर आला आहे.
असे असतानाही शासनाकडून जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा होत असून, आता जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचाही परिणाम लसीकरणावर दिसून येत आहे. सिरिंज नसल्यामुळे सोमवारी कमी लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.
-------------------------------
२५२०० सिरिंज मिळाल्या
जिल्ह्याला शनिवारी ३०९०० कोव्हॅक्सिन व २६००० कोविशिल्डचे डोस मिळाले. त्यानंतर मंगळवारी १२००० कोविशिल्ड व १११५० कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले आहेत. म्हणजेच सुमारे ८०००० डोसेसचा साठा जिल्ह्याकडे आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा असल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. अशात मंगळवारी जिल्ह्याला २५२०० सिरिंजचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तरीही आणखी सिरिंजची गरज पडणार आहे.
-----------------------------
केंद्रांची संख्याही वाढणार
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे अचानकच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या घटवावी लागली. त्यामुळे लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातच गोंधळ उडाला आहे. लवकरात लवकर लसीकरण आटोपण्यासाठी शासन जोर देत असतानाच जिल्ह्यात विपरीत स्थिती दिसून येत आहे. मात्र, लसींचा साठा असल्याने आता केंद्रांची संख्याही वाढविली जाणार आहे.