गोंदिया : सामाजिक न्याय विभागासह अन्य विभागाच्या विविध योजना आहेत. जिल्ह्यात अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला नाही. लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने यंत्रणांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, अशी अपेक्षा तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी व्यक्त केलीबुधवारी (दि.८) सामाजिक न्याय भवनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर होते. प्रमुख म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले उपस्थित होते.डॉ.सैनी यांनीे विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा. या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच या विभागाच्या अधिनस्त असलेल्या महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना द्यावी असे मत मांडले. शिवणकर यांनी, सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी वाढली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजही समाजात आर्थिक व सामाजिक असमानता आहे. अशाप्रकारची विकृती दूर करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पटले यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात समता निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन राज्यघटना लिहिली आहे. कोणीही आपल्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने किराणा दुकान व्यवसाय सुरु करण्यासाठी मनोज रंगारी, पुर्णिमा बंसोड, बबिता निकोसे या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक समाजकल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी मांडले. चव्हाण यांनी संचालन केले. आभार मुख्याध्यापक रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ खोब्रागडे, ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक झोडापे, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक कानेकर, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या संगीता घोष व अन्य प्राध्यापक, दलीतमित्र राऊत, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जेष्ठ पत्रकार एच.एच. पारधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, समाजकल्याण वसतीगृहाचे विद्यार्थी, ग्रंथालयात अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
यंत्रणांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे
By admin | Published: April 10, 2015 1:26 AM