गोंदिया : कोरोना संसर्ग काळात लोकांचे जीव वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. कोविड संकटकाळी गोरगरिबांना मदत करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. आपण सगळे मिळून काम करून कोविडविषयी सज्ज राहून लढा देऊ, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्याचा आढावा
घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, सहेषराम कोरोटे, माजी आमदार
राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस
अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते. कोविड रुग्ण आजारातून बरे झाल्यानंतर त्यांचे प्राथमिक आरोग्य
केंद्रात समुपदेशन करण्यात यावे. जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्णांसाठी योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून पर्याप्त
औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णालयात पर्याप्त औषध साठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता आहे, याकडे लक्ष देण्यात यावे. ग्रामीण भागात नागरिकांना कोविड लसीकरणाबाबत पुरेपूर माहिती देण्यात यावी. मिशन मोडमध्ये काम झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आमदार कोरोटे यांनी ग्रामीण भागातील रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे पुरेपूर सुविधा
उपलब्ध होत नाही, याकडे लक्ष वेधले. माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले, गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व कोविड केअर सेंटरमध्ये कूलरची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आता दोन आरटीपीआर मशीन उपलब्ध असून दररोज जवळपास दोन ते अडीच हजारांपर्यंत स्वॅब नमुने तपासणी करता येणार असल्याचे सांगितले. नगर परिषदेतर्फे कोविडने मृत्यू झालेल्या रुग्णांची रीतसर अंत्यविधी करण्यात येत आहे. सभेला अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम, औषध निरीक्षक संदीप नरवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.
........
४३ रुग्णालयांचे फायर ऑडिट
सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येत आहे. आतापर्यंत ४३ रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणेकडून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.