दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ताडोबातील अल्लादिन नामक वाघ भटकंती करत गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी (दि.१३) या वाघाचे तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे अल्लादिन वाघ या परिसरात वास्तव्यास असलेल्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प व नागझिरा अभयारण्य गोरेगाव वन परिक्षेत्राला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. मागील तीन- चार दिवसांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेला अल्लादिन नामक वाघ या प्रकल्पातून गायब झाल्याची चर्चा होती. यानंतर वन्यजीव विभागाने ट्रॅकरच्या मदतीने या वाघाचा शोध सुरू केला होता. त्यानंतर हा वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात दाखल झाल्याची माहिती होती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती गोंदिया वन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या चमूने शोध कार्य सुरू केले होते. दरम्यान, हा वाघ तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. वन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघाचे दर्शनसुद्धा झाल्याची माहिती आहे. गोरेगाव वन परिक्षेत्रात पूर्वीच ६ वाघ वास्तव्यास होते. त्यातच आता ताडोबातील अल्लादिन वाघाची भर पडल्याने या परिसरातील वाघांची एकूण संख्या आता ७ वर पोहोचली आहे.
पर्यटकांना उत्सुकता
ताडोबातील अल्लादिन नामक वाघ गोरेगाव वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याचे वृत्त कळताच वन्यजीवप्रेमींचा या वाघाला पाहण्याचा उत्साह वाढला आहे, तर मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाने तीन- चार जणांवर हल्ला केला असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.