आंबेडकर भवनासाठी जनाक्रोश : एसडीओ व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनुेबोंडगावदेवी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अर्जुनी-मोरगावचे उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना देण्यात आले.दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. त्या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनिक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वास्तू रात्रीच्या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. सदर कृत्याचे तालुका भारिप बहुजन महासंघ तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंबेडकर भवन तसेच बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस उध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्या कृत्याच्या निषेधार्थ तालुका बंद ठेवण्याचा इशारासुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे. निवेदन देताना तालुका भारिप बहुजन महासंघाचे ताराचंद सुखदेवे, गौतम रामटेके, प्रकाश टेंभुर्णे, प्रफुल्ल तुरकर, शांतिप्रकाश भैसारे, दीपक चवरे, अशोक खोब्रागडे, विजय सांगोडे, मयूर खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमगाव २५ जून रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असामाजिक तत्वांनी उध्वस्त केले. त्यांना अटक करून त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सर्व आंबेडकरी जनतेने मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देवून केली आहे. निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४४ मध्ये मुंबईत चित्रा टॉकिजजवळ दादर येथे आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या इमारतीत समता सैनिक दल, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा यासारख्या सामाजिक संस्थांचे कार्यालये आहेत. या संस्था समाजात चांगले कार्य करीत असल्यामुळे समाज व राजकारणात प्रभाव वाढत आहे. हा वाढता प्रभाव काही असामाजिक तत्वधाऱ्यांना सहन झाला नाही. आपण वैचारिक लढाई जिंकू शकणार नाही त्यामुळे त्यांना असुरक्षितपणा वाटू लागला. वाढता प्रभाव सहन न झाल्यामुळेच २५ जून रोजी पहाटे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक भवन पाडण्याचे असामाजिक कार्य केले. त्यामुळे देशभरात असंतोषाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदर भवन पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्व आरोपींना अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना एस.टी. भालेकर, संदीप मेश्राम, चंद्रभान कोटांगले, कविता नागदेवे, मनिषा मेश्राम, सिद्धार्थ डोंगरे, ओमप्रकाश घरडे, प्रफुल्ल मेश्राम, प्रकाश ब्राह्मणकर, सुरेश बोरकर, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.
भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: July 04, 2016 1:31 AM