बटाणा येथील नागरिकांची मागणी : शासनाला पुरविली खोटी माहिती गोंदिया : घरकुलाचा लाभ मिळाला नसतानाही संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे दर्शविण्यात आले. तशी शासनास खोटी माहिती पुरविणाऱ्या बटाणा ग्रामपंचायतचे सचिव व त्यांना पाठिशी घालणाऱ्या पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया तालुकांतर्गत येणाऱ्या बटाणा येथील ग्रामस्थांनी व बौद्ध समाजबांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.बटाणा येथील बीपीएलधारक किशोर रामटेके व अरविंद रामटेके यांना आतापर्यंत शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ मिळाला नाही. तरीपण सदर लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची खोटी माहिती येथील ग्रामसेवकाने प्रशासनास सादर केली. याबाबत माहिती अधिकारात मागणी केल्यानंतर त्यात सदर लाभार्थ्यांना यापूर्वी कोणताही घरकुलाचा लाभ मिळाला नाही, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्यांना आजपर्यंत कोणतेही घरकुलाचे लाभ मिळालेले नाही, तरीपण येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली येवून येथील ग्रामसेवकाने प्रशासनास सदर लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची खोटी माहिती सादर केली आहे. आता सदर लाभार्थ्यांना यापूर्वी लाभ मिळाले म्हणून पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी वालकर यांनीसुद्धा या प्रकरणाची चौकशी न करता तालुक्यात नवबौद्ध बीपीएल धारकांची प्रतीक्षायादी संपली आहे, अशी खोटी माहिती प्रशासनास सादर केली आहे. मात्र एकट्या गोंदिया तालुक्यात अन्याय झालेले जवळपास ५०० च्यावर नवबौद्ध बीपीएलधारक घरकुलाच्या लाभापासून वंचित ठरले आहेत.सध्या राज्याचे समाजकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजकुमार बडोले कार्यभार सांभाळत आहेत. नुकताच संपूर्ण जिल्ह्याभर सामाजिक सप्ताह राबविण्यात आला. मात्र याच सप्ताहात गरीब बीपीएल धारकांवर प्रशासनाकडून अन्याय करण्यात आला आहे. राज्याचे समाजकल्याण मंत्री हे मागासवर्गीय समाजातील असतानासुद्धा जिल्ह्यातील मागासवर्गीयांवर अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाचे भय उरले नाही, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. सदर प्रकरणाची तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यापूर्वी अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु अद्यापही अन्यायग्रस्त नवबौद्ध नागरिकांना न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून अन्यायग्रस्तांना लाभ मिळवून देण्यात यावा व दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बटाणा येथील किशोर रामटेके, अरविंद रामटेके, सर्व ग्रामस्थ व बौद्ध समाजातील सर्व नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारासुद्धा त्यांनी प्रशासनास दिला आहे. (प्रतिनिधी)
ग्रामसेविका व खंडविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: April 18, 2015 12:43 AM