गोंदिया : अतिरिक्त दराने स्टॅम्प पेपरची विक्री करणाऱ्याची तक्रार तिराेडा येथील दिलीप लिल्हारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुय्यम निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना खाेटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप लिल्हारे यांनी केला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तिरोडा येथील एका मुंद्राक विक्रेत्याने १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरची ११० रुपयांना विक्री केली. याबाबत लिल्हारे यांनी त्या मुद्रांक विक्रेत्याला विचारणा केली असता त्यांनीच उद्धट भाषेत बोलून धमकी दिली. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले; पण चाैकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुद्रांक विक्रेत्याची बाजू घेऊन चौकशीत खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्टॅम्प विक्रेत्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी लिल्हारे यांनी केली आहे.