जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा पुनर्विलोकन समितीची सभागोंदिया : जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत असून त्यांची आर्थिक लुटही होत आहे. अशा प्रकारचा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. यावेळी समितीचे सदस्य सचिव पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे प्रतिनिधी प्रा.डॉ.व्ही.पी.रूखमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक मनीष गोतमारे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.काही डॉक्टर्स त्यांच्या दवाखान्याच्या दर्शनी भागाच्या फलकावर स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ असल्याचे तसेच चुकीची वैद्यकीय पदवी लिहीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, अशाप्रकारे त्या फलकावर लिहून ते रु ग्णांची दिशाभूल व फसवणूक करीत आहे. अशा डॉक्टरांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. काही डॉक्टर्स रु ग्णांना आवश्यकता नसताना रक्त चढवितात हे चुकीचे आहे. सार्वजनिक व खाजगी भिंतीवर मोठ्या ठळक अक्षरात विशिष्ट रोगावर रामबाण उपाय तसेच कोणताही दुर्धर रोग बरा करण्याची हमी देण्याच्या जाहिराती लिहून तसेच त्याचे पॉम्पलेट्स काढून रुग्णांची फसवणूक करीत आहे. अशा जाहिराती करण्यावर पूर्णपणे बंदी असून अशा बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसायिकांना संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी महाराष्ट्र वैद्यक परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद व महाराष्ट्र दंत वैद्यक परिषद या चार वैधानिक परिषदांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या तरतुदीचा भंग करणाऱ्याविरु ध्द १ ते ३ वर्षाची कारावासाची शिक्षा असून आर्थिक दंडाचीही त्यामध्ये तरतूद आहे. जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायीकांना हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ.सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या व्यक्तीबाबत काही तक्र ारी प्राप्त झाल्याचे डॉ.राज गहलोत यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे निरिक्षक गोतमारे यांनी जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायीकांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. प्राप्त तक्रारी, बोगस वैद्यकीय व्यवसायिकांच्या यादी व गावपातळीवरील शोध मोहिमेतून आढळणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)तालुका व गाव पातळीवर यंत्रणाची जबाबदारीजिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बोगस वैद्यकीय डॉक्टर्स शोधण्यासाठी मोहीम राबवावी. तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करुन त्या समितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरिक्षक यासह अन्य यंत्रणांचा समावेश करावा. गाव पातळीवर अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची मदत घ्यावी. गावनिहाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार करावी. त्या डॉक्टरांकडून वैद्यकीय पदवी तसेच त्यांचा नोंदणी क्र मांक मागवून घ्यावा.
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
By admin | Published: June 29, 2016 1:44 AM