लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, दक्षिण देवरीअंतर्गत घोनाडी येथील वन कम्पार्टमेंट ५९८ मधील जंगल शिवारातील सागवान झाडांची कत्तल करणाऱ्या वनमजुराला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गांभीर्याने दखल घेत याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश वन विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहेत.
येथील दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी संबंधित प्रकरणात स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून कुठली चौकशी झाली, यासंदर्भात उपवनसंरक्षक कार्यालय विभाग, गोंदिया आणि वनपरिक्षेत्र कार्यालय, देवरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून माहिती मागितली होती. दोन्ही कार्यालयांकडून प्राप्त माहितीमध्ये विसंगती आढळली. वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून संबंधित प्रकरणात उपवनसंरक्षक कार्यालय आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून कुठलीही चौकशी झाली नसल्याचे आढळले.
या प्रकरणातील दोषींना विभागाकडून पाठबळ दिले जात असल्याची बाब लक्षात आली. याची सखोल माहिती संस्थेकडून पत्र व्यवहार करून मागविली. त्यात या प्रकरणात शासकीय दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केली असल्याचे आढळले. घोनाडी येथून वनविभागाच्या डोंगरगाव डेपो येथे पाठवलेल्या जप्ती वनोपजाच्या संख्येत प्राप्त माहितीनुसार विसंगती आढळली.
प्रकरणाची चौकशी करण्याकडे दुर्लक्षवनपरिक्षेत्र दक्षिण देवरीअंतर्गत घोनाडी क्षेत्रात सागवान अफरातफर प्रकरणात वनविभागाच्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी यांचा खरच हस्तक्षेप तर नाही ना? स्थानिक वनमजूर, वनरक्षक व वनपाल या लोकसेव कांकडून त्यांच्या कर्तव्यात बेजबाबदारपणा केला असतानासुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण देवरी यांनी या प्रकरणाची चौकशी का केली नाही? असे अनेक प्रश्न या प्रकरणासंदर्भात संस्थेला निर्माण झाले आहेत. संस्थेची संबंधीत प्रकरणाची वरिष्ठ विभागाकडून योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करून जनतेला न्याय देण्यासंदर्भात उपवन संरक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवव्हार केला असता उपवनसंरक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. परंतु, उपवनसंरक्षक कार्यालय, गोंदियाकडून संबंधीत प्रकरणाची चौकशी झाली नाही, असे आढळून आले.
चौकशी करून अहवाल मागविलाया प्रकरणा- संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी याची दखल घेत राज्याचे प्रधान सचिव यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशावर प्रधान सचिव यांनी त्वरित कार्यवाही करीत राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) नागपूर यांना सदर प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी व उपवनसंरक्षक गोंदिया यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत का आहे? तसेच घोनाडी येथील जप्ती वनोपज तत्कालीन वनसंरक्षक यांच्या निवासस्थानी ठेवण्याचे कारण काय? यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देऊन या प्रकरणाच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.