रक्तपेढी विभाग : जागतिक पॅथालॉजी डे साजरागोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बाई गंगाबाई रूग्णालयात रक्तपेढी विभागातर्फे १८ नोव्हेंबर रोजी जागतिक पॅथालॉजी डे साजरा करण्यात आला. यानिमित्त गरोदर महिला व कुपोषित बालकांची मोफत रक्त तपासणी व त्याचे महत्त्व यावर चर्चासत्र घेण्यात आले.बाई गंगाबाई महिला रूग्णालयात जननी शिशु सुरक्षा योजना या केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत मोफत रक्त तपासणी करण्यात येते. प्रास्ताविक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वीणा पारधी यांनी केले. गोंदिया जीएमसीचे विकृती शास्त्रज्ञ डॉ. शेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात, संपूर्ण उपचाराची दिशा ही रक्ताच्या रिपोर्टवर अवलंबून असते. तेव्हा रक्त तपासणी डॉक्टरकडूनच करून घ्यावी, असे आवाहन केले.महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अॅन्ड मायक्रोबॉयलॉजिस्टने बोगस पॅथोलॅबचा धोका विषद केला आहे. प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये डॉक्टर पॅथालॉजिस्टची गरज असते. पण अनेक पॅथ लॅबमध्ये केवळ टेक्निशियन्स वैद्यकीय अहवालावर सह्या करतात. प्रत्येक नर्सिंग होम्सला एक साईड लॅब असते. ती केवळ दहावी-बारावी पास, अर्हता नसलेल्या तंत्रज्ञाकडून बऱ्याचदा चालविली जाते.प्रत्येक पॅथ लॅबमध्ये रजिस्टर्ड पॅथालॉजिस्टची गरज असते. त्याची महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक असते. परंतु गोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यातही जागोजागी बोगस लॅब चालू आहेत.बोगस पॅथोलॅबचा सर्वात मोठा धोका म्हणजे चुकीचे वैद्यकीय अहवाल पेशंटला मिळण्याची भीती असते. अशाप्रकारे चुकीच्या रक्त तपासणी अहवालामुळे अनेकदा गंभीर गुंतागुंत होते. म्हणून यावर्षीचे जागतिक पॅथालॉजी डेचे घोषवाक्त ‘पॅथालॉजी जाणून घ्या-तुमचा रिपोर्ट समजून घ्या’ अशा प्रकारचे आहे. या वेळी गर्भवतींना हिमोग्लोबिन, सीबीसी, रक्तगट, सिकलसेल, कावीळ, एचआयव्ही इत्यादी तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. संचालन व आभार राजू रहांगडाले यांनी केले. याप्रसंगील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
अधिकृत प्रयोगशाळेतूनच रक्त तपासणी करा- शेंडे
By admin | Published: November 21, 2015 2:18 AM