अर्जुनी मोरगाव : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात आरोग्य यंत्रणेने योग्य उपाययोजना करून एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ऑक्सिजन गरज आणि उपलब्धता याचे नियमित नियोजन करण्याच्या सूचना खा. सुनील मेंढे यांनी बुधवारी येथे आयोजित आढावा बैठकीत केल्या.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले, लायकराम भेंडारकर, तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर, रघुनाथ लांजेवार, डॉ. गजानन डोंगरवार, प्रकाश गहाणे, संदीप कापगते, गिरीश बागडे, राधेश्याम भेंडारकर, तहसीलदार विनोद मेश्राम, मुख्याधिकारी शिल्पा जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, धुमणखेडे, वैद्यकीय अधीक्षक अरविंद अकिलवार, गटशिक्षणाधिकारी मांढरे, खंडविकास अधिकारी राठोड, विजय कापगते उपस्थित होते. यावेळी खा. सुनील मेंढे यांनी रुग्णांना मिळणाऱ्या औषधोपचारापासून ते अगदी उपलब्ध मनुष्यबळ आणि लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला. तालुक्यातील रुग्ण संख्येची माहिती जाणून घेतली. प्रत्येकाला उपचार देणे, आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. प्राणवायूची आवश्यकता आणि उपलब्धता यावर चर्चा करण्यात आली. आशा वर्कर यांना ऑक्सिमीटर आणि थर्मल गन देण्याचे निर्देश खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका देण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आल्या. लसीकरणाचे नियोजन प्राधान्याने करावे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी. तिसरी लाट वरचढ ठरू नये, यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे असल्याचे खासदारांनी सांगितले. यावेळी मेंढे कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट देण्यात आले.