गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत सिकल सेल नियंत्रण कार्यक्रमातर्फे जागतिक सिकल सेल डेनिमित्त केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी मोफत सिकल तपासणी शिबिर व जनजागरण अभियान आयोजित केले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात या कॅम्पचे आयोजन ओपीडी विभागात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सुवर्णा हुबेकर, जिल्हा परिषद येथील जिल्हा समन्वयिका सपना खंडाईत व सिकल सेल तंत्रज्ञ लिलहारे, अनिल गोंडाने व अतुल सतदेवे उपस्थित होते. या वेळी बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण व नातेवाईक यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर सिकल बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करून घेणे व दररोज पौष्टिक आहार, ताजी फळे व भरपूर पातळ पदार्थ यांचे सेवन करावे. पल्स ऑक्सिमीटरने नियमितपणे ऑक्सिजन पातळी चेक करावी. फॉलिक ॲसिड गोळीचे आवश्यकतेनुसार सेवन करावे. कुठलाही ताप आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप अंगावर काढू नये. तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. विवाहयोग्य युवक-युवतींनी आपली रक्ततपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक सिकल सेल दिनानिमित्त ओपीडीमध्ये सिकेल सेल प्रदर्शनी आयोजित केली होती. याचे उद्घाटन सपना खंडाईत व अतुल सतदेवें यांचे हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थितीत नागरिकांना सिकल सेल माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. २७ रुग्णांची मोफत सिकल सेल तपासणी करण्यात आली.