खासदारांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्र्यांकडे कैफियतगोंदिया : धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे खासदार तथा भाजपाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. गोंदियात शनिवारी रात्री ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.देवरी, आमगावमधील कार्यक्रम आटोपून गोंदियात आले असताना खा.नेते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आदिवासी विकास महामंडळाने राईस मिलर्सना धान भरडाई करण्यासाठी देताना तेवढ्या धानाची अनामत रक्कम भरून घेणे गरजेचे आहे. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने मिलर्सकडून कोणतीही अनामत रक्कम न घेता त्यांना ४०० ते ५०० कोटी रुपयांचा धान भरडाईसाठी दिल्याचे खा.नेते म्हणाले. राईस मिलर्सने अजूनपर्यंत तो धान भरडाई करून दिला नाही. त्यात गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सर्वाधित आहेत. वास्तविक त्या धानाची रक्कम मिलर्सकडून व्याजासह वसूल करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्या राईस मिलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे खा.नेते यांनी सांगितले.गोदामांअभावी आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दरवर्षी उघड्यावर टाकावा लागतो. तो धान नंतर खराब होऊन कवडीमोल भावात विकावा लागतो. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याकडेही नेते यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.महामार्गाच्या विकासाचे गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार असून पाच महामार्ग चारपदरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकास कामांसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचेही खा.नेते यांनी यावेळी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)आमगावात पुन्हा घेणार आढावाखा.अशोक नेते यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आमगाव-देवरी-सालेकसा या तीन तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि कोणकोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी खा.नेते यांनी शनिवारी आमगाव येथे आढावा बैठक आयोजित केली होती. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला मात्र २६ विभाग प्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे नेते यांनी त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. सोबतच ही बैठक रद्द करून पुन्हा आमगावात आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.
धान बुडविणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा
By admin | Published: October 05, 2015 1:59 AM