पालकमंत्री बडोले : भीमघाटावर अशोक स्तंभाचे भूमिपूजन गोंदिया : महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीच्या विकासाचा धम्म आहे. सम्राट अशोकांनी आपले संपूर्ण कुटूंब धम्माच्या प्रचारासाठी जगात पाठविले. थायलँड, जपान, श्रीलंका या देशात जावून बघितल्यावर खरा धम्म पाहायला मिळतो. फक्त स्मारक उभारल्याने धम्म मोठा होणार नाही तर तो आचरणात आणून आपण जगलो पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अशोक सर्वांगिण विकास सोसायटी, पुणेतर्फे १४ स्तंभ उभारणीच्या संकल्पनेतील आठव्या अशोक स्तंभाचा भूमिपूजन सोहळा रविवारी पांंगोळी येथील भीमघाटावर आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दि. २३ एप्रिल १९५४ ला गोंदिया येथे झालेल्या आगमनाचे औचित्य साधून हा स्मारक तयार होत आहे. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक शीलवन्त, डॉ.प्रशांत पगारे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, नगरसेवक घनश्याम पाणतावने, नविनर्वाचित नगरसेविका देविका रुसे, कुंदा पंचबुद्धे, विष्णू नागरिकर, झामसिंग येरणे, रतन वासनिक, महेंद्र कठाणे, श्याम चौरे, भदंत डॉ.तिस्सवंत, भदंत श्रद्धा बोधी, धनजंय वैद्य, बसंत गणवीर, राजू नोतानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.बडोले म्हणाले, कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या कार्यक्र मात अशोक शिलवंत यांच्याशी १३ स्तंभापैकी आपल्या जिल्ह्यातही अशोक स्तंभ व्हावा अशी चर्चा होवून आठव्या स्तंभासाठी भिमघाट हे ठिकाण निश्चित झाले. ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. याठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी असून ही पावन भूमी आहे. येणाऱ्या २३ एप्रिलाच या अशोक स्तंभाचे कार्य पूर्ण करून लोकार्पण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजचे जग हे आऊटसोर्सिंग व कॉर्पोरेटचे आहे. यात आरक्षण नसून यासाठी आपल्या युवावर्गाला तयार व्हावे लागेल असे ना.बडोले म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांनी ना.बडोले यांचे कौतुक करून पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाचे कार्य हे जनतेला कळत असल्याचे त्या म्हणाल्या. समाजातील युवकांनी आरक्षणाच्या मागे न लागता स्वकौशल्याने पुढे जाऊन समाजाचा विकास करून बाबासाहेबांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. संचालन धनंजन वैद्य व लक्ष्मीकांत डहाटे यांनी तर आभार श्याम चौरे यांनी मानले. कार्यक्रमात भिमगितांचा नजराना सादर करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)
धम्म आचरणात आणा
By admin | Published: January 24, 2017 2:07 AM