गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, मागील वर्षी १३ मार्चपासून या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, ही सेवा प्रवाशांसाठी केवळ औटघटकेचीच ठरली. केवळ सहा महिन्यांतच ही सेवा बंद झाली. त्यानंतर आता विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेच्या टेकऑफमध्ये कामठा-परसवाडा मार्गाचा खोडा निर्माण झाला आहे. जेव्हापर्यंत हा खोडा दूर होत नाही तेव्हापर्यंत प्रवासी विमान वाहतूक सेवेचे टेकऑफ होणे कठीण असल्याचे संकेत विमानतळ प्राधिकरणाने दिले आहेत.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सन २०१३ मध्ये तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आले होते; पण या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचा प्रारंभ करण्यासाठी खा. सुुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले. नोएडा येथील फ्लाय बिग या विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेत १३ मार्च २०२२ पासून या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ केला.
इंदूर-गोंदिया-हैदराबाद या विमानसेवेला प्रारंभ केला. याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला; पण या कंपनीने करार संपण्यापूर्वीच सहा महिन्यांतच सेवा बंद केली. तेव्हापासून या विमानतळावरून पुन्हा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली नाही. बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यासुद्धा उत्सुक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे तूर्तास तरी प्रवासी विमान वाहतूक सेवेचे टेकऑफ कठीणच असल्याची माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
रनवेच्या रूटमध्ये मार्गाचा खोडा
विमानतळाचा परिसर हा शहराबाहेर मोकळ्या जागेवर असावा, शिवाय यात कुठल्याही मार्गाची अथवा गावाची अडचण येऊ नये; तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाची काही नियमावली आहे; मात्र बिरसी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरूनच कामठा-परसवाडा हा मार्ग गेला आहे. या मार्गामुळे रनवेच्या रूटमध्ये अडचण निर्माण होत आहे. जेव्हापर्यंत ही अडचण दूर होत नाही तेव्हापर्यंत या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रश्न कायम राहणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
प्राधिकरणालाच नको आहे का सेवा?
बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाल्यास बिरसी विमानतळ प्राधिकरणाला या ठिकाणी नाईट लँडिंगसह इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. शिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण वाढेल. या सर्व गोष्टींमुळेच प्राधिकरणाला प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होऊ नये, असे वाटत असल्याची चर्चा आहे. फ्लाय बिग विमान कंपनीनेसुद्धा बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या चर्चेत काहीसे तथ्य असल्याचे बोलले जाते.
भविष्यात सुरू होणार होती मुंबई-पुणे सेवा
बिरसी विमानतळावरून इंदूर-गोंदिया-हैदराबाद या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आल्यावर त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे भविष्यात या विमानतळावरून मुंबई, पुणे, संभाजीनगर येथे प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार होती; पण हेदेखील आता केवळ स्वप्नच ठरले आहे.
बिरसी विमानतळावरून तूर्तास तरी प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. यासाठी अद्याप एकाही विमान कंपनीने तयारी दर्शविली नाही. तर ही सेवा सुरू करण्यात कामठा-परसवाडा या मार्गाचीदेखील रनवेच्या रूटमध्ये अडचण आहे.
- शफिक शाह, संचालक, बिरसी विमानतळ प्राधिकरण