गोंदिया : गोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यात कमी वजनाचे कुपोषित बाळ जन्माला येत असल्याने त्यांचा मृत्यू होतो. याकरिता जन्मताच बाळाचे वजन ३ किलोपेक्षा जास्त असावे यासाठी गर्भवतींना आर्यन, फोलिक व कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने द्याव्या. गर्भवतीला संतुलित आहार द्यावा व हायरिस्क गर्भवतींची विशेष काळजी घ्यावी, असे प्रतिपादन येथील केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.
राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत १ ते ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित प्रधानमंत्री मातृत्व वंदन सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कुंभारेनगर येथील अर्बन हेल्थ सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार, रूपाली टोणे, समुपदेशिका सारिका तोमर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. हुबेकर यांनी, सुरक्षित मातृत्व व बाल जीवित्व ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. याकरिता हायरिस्कमधील गर्भवतीच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेचे निदान होताच १२ आठवड्यांच्या आत आरोग्य सेविकेकडे गर्भवतीची नोंद करावी. त्यांना धनुर्वाताची लस लावून घ्यावी, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस लावावी, अत्यावश्यक असलेली रक्ताची हिमोग्लोबीन, सीबीसी, रक्तगट, मलेरिया, रक्तशर्करा, सिकलसेल, गुप्तरोग, हिपेटायटीस व एचआयव्ही तपासणी करावी. पहिल्या तिमाहीत एक सोनोग्राफी जरूर करावी जेणेकरून गर्भातील बाळात काही व्यंग असल्यास त्याची माहिती मिळते. स्वस्थ बाळासाठी गर्भवतीचे आरोग्य व लसीकरण गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------------
३७ गर्भवतींची तपासणी व लसीकरण
या कार्यक्रमात ३७ गर्भवती मातांची मोफत वैद्यकीय तपासणी व नि:शुल्क लसीकरण करण्यात आले. पोषाहाराबाबत सारिका तोमर माहितीही दिली व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे नोंदणी अर्ज आशा सेविकांमार्फत गर्भवती महिलांना देण्यात आले. शिवाय, गर्भवती महिलांना कॅल्शियम व आरोग्यवर्धक टॉनिकचे मोफत वितरण करण्यात आले.