लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र दिलेल्या तारखांना टेकऑफ झालेच नाही. त्यातच आता खा. सुनील मेंढे यांनी बुधवारी १३ मार्चपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. मात्र यासंदर्भात बिरसी विमानतळ प्राधिकरणाला उड्डयन मंत्रालयाकडून अद्याप कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे १३ मार्चपासून टेकऑफ, की पुन्हा तारीख, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग केवळ मंत्री व काही विशेष व्यक्तींसाठी केला जात होता. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला विमानसेवेने जोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागूृन आहे, तर गोंदिया येथे रेल्वे जंक्शन सुध्दा आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाल्यास त्याची निश्चितच प्रवाशांना मदत होऊ शकते. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. ते प्रयत्न आता फळाला आले असून नोयडा येथील फ्लॉय बिग या कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेतले आहे, तर विमानतळ प्राधिकरणाने प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या आणि सुविधा देखील सुसज्ज केल्या आहेत. मात्र टेकऑफचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर जात आहे. आतापर्यंत टेकऑफच्या अनेक तारखा देण्यात आल्या, मात्र मुहूर्त काही साधला गेला नाही. त्यातच आता खा. सुनील मेंढे यांनी १३ मार्चचा नवीन मुहूर्त दिला आहे. तो तरी साध्य होतो की नाही, याचीच सध्या चर्चा सुरू आहे.
गोंदिया-इंदोर-हैदराबाद सेवा - बिरसी विमानतळावरून पहिल्या टप्प्यात गोंदिया-इंदोर-हैदराबाद अशी विमानसेवा प्रारंभ करण्यात येणार आहे. सुरुवातीला दोनच फेऱ्या होणार असून त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, तर भविष्यात गोंदिया-मुंबई आणि गोंदिया-पुणे विमान सेवा सुध्दा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
असे असेल वेळापत्रक- गोंदियाकरिता इंदोरवरून सकाळी ७.१५ ला विमान निघेल ८ वाजता गोंदियाला पोहोचेल. ८.२५ ला गोंदियावरून हैद्राबादकरिता निघेल. दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना व्हिलचेअरने नेण्याची व्यवस्था कुठल्या रस्त्याने असेल, रनवेपर्यंत बससेवा आणि अंतर किती असेल, प्रवासी कुठल्या गेटने आत येईल व बाहेर जाईल.
उड्डाण सेवेचा लाभ- ज्या विमानतळावरून प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यात प्रवाशांना तिकीट कमी दरात (२०००-२२०० रुपये) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उड्डाण नावाची योजना सुरू केली. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया-इंदौर-हैदराबाद ते चेन्नईकरिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिडकी आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या २६ ते जानेवारीपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.