सालेकसा : आपल्या विविध मागण्या संदर्भात सालेकसा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल पासून काळीफित लावून काम सुरू केले आहे. तरीही शासनाने तलाठ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील एकूण १७ तलाठी व तीन मंडळ अधिकारी यांनी लेखणी बंद आंदोलन करीत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे सर्व तलाठी कार्यालय बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची कामे खोळबली आहेत.विविध मागण्या घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. त्यात तलाठी साज्यांची व महसूल मंडळाचे पुर्नरचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनीज वसूली या कामातून तलाठी संवर्गाला वगळणे, तलाठी कार्यालय महसूल विभागाने बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करणे व इतर मागण्यांना घेऊन तलाठ्यानी आपले लेखनी बंद आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत शासनाला पाठविले आहे. या मागण्यासंदर्भात शासनाने चर्चा केली परंतु आतापर्यंत निर्णय घेतला नाही. जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पर्यंत लेखणी बंद सुरू राहणार तसेच ११ एप्रिलनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा तलाठी संघटनेचे अध्यक्ष आर.एम. ठाकरे यांनी दिला आहे. या आंदोलनात मंडळ अधिकारी एन.बी. रघुवंशी, डी.टी. हत्तीमारे, के.बी. शहारे, तलाठी आर.एम. ठाकरे, आर.एस. ब्राह्मणकर, आर.एन. ताकडे, एन,ए. वालोदे, बी.सी. तुरकर, के.डी. बागडे, एस.आर. पंधरे, व्ही.टी. राऊत, टी.आर. बघेले, बी.डी. वरखडे, एम.एन. कळंबे, एच.ई. फटिंग, आर.एच. मेश्राम, आर.एन. गुप्ता, जी.बी. नागपुरे यांचा समावेश होता. (वार्ताहर)
तलाठ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरु
By admin | Published: April 10, 2016 2:07 AM