आमगाव : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी शासनाकडून ५ ब्रास रेती निःशुल्क दिली जात आहे. त्यानुसार, येथील महसूल विभागाकडून ननसरी रेती घाट येथून घरकुलासाठी ३ तालुक्यांतील लाभार्थ्यांना नि:शुल्क रेती दिली जात आहे. अशात ननसरी येथील रेती घाटावर तलाठी सकाळपासूनच पाहारा देत आहेत.
नायब तहसीलदार एस.एम नागपुरे यांच्या आदेशानुसार, रेतीची परवानगी दिली जात असून, अद्याप ६७२ ब्रास रेती वितरित करण्यात आली आहे. निःशुल्क रायल्टीकरिता ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, लाभार्थाचे आधार कार्ड, तहसीलदारांच्या नावाने अर्ज आदी कागदपत्र लागतात. टॅक्टरचे भाडे मात्र लाभार्थाना द्यावे लागणार आहे. एका गावात १०० ते २०० घरकुले मंजूर झाले असून, बांधकामाला सुरुवात झाली आहे. या रेतीघाटवरून सालेकसा, देवरी व आमगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना नि:शुल्क रॉयल्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन काळापासून रेतीची किंमत ३-४ हजारांवर होती, पण शासनाने हा सहानुभूतीपर निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कार्यात तहसीलदार भोयर, नायब तहसीलदार नागपुरे, तलाठी आणि महसूल विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.