गोंदिया : जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी वृद्धेकडून १८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी व कोतवालास रंगेहाथ अटक केली. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गिधाडी येथे तलाठी कार्यालयातच गुरुवारी (दि. २८) सायंकाळी चार वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. मधुकर नकटू टेंभुर्णीकर (वय ५५, रा. गोरेगाव) असे लाचखोर तलाठी, तर राकेश संपत वालदे (३८, रा. गिधाडी) असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे.
तक्रारदार (६२) महिलेच्या पतीला तीन भाऊ व चार विवाहित बहिणी आहेत. त्यांच्या दिराचे लग्न झाले नसून ते तक्रारदाराकडेच राहत होते. दिराने आजारपणामुळे त्यांची गिधाडी येथील भू. क्र. १ खा.क्र. ३५७ मध्ये असलेली एक हेक्टर शेती तक्रारदार यांच्या नावाने नोंदणी करून दिली आहे. दिराच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी मृत्युपत्रानुसार जमिनीचे आपल्या नावावर फेरफार करण्यासाठी मार्च-२०२३ मध्ये तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली. मात्र, तलाठी टेंभुर्णीकर याने कोतवाल वालदे याच्यामार्फत २० हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता विभागाकडून गुरुवारी (दि. २१) सायंकाळी चार वाजतादरम्यान तलाठी कार्यालयात पडताळणी करण्यात आली. तलाठी टेंभुर्णीकर याने तडजोडीअंती कोतवाल वालदे याच्यामार्फत १८ हजार रुपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, सापळा अधिकारी पो. नि. उमाकांत उगले, पोनि. अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.