केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव (बंध्या) या गावाचा समावेश चिचोली सजा क्रमांक २२ मध्ये असून, येथील कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे वडेगाव (बंध्य) येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणारा सातबारा आणि शालेय विद्यार्थ्यांना लागणारा उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे गावातच व्हावीत यासाठी प्रत्येक सजाकरिता तलाठी कार्यालयासह निवासाची व्यवस्था केली आहे; परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चिचोली सजा क्रमांक २२ येथील तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे या सजांतर्गत येणाऱ्या वडेगाव (बंध्या) येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणाऱ्या सातबारासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अनेकदा चकरा मारूनही तलाठी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
.......
शेतकऱ्यांची नोंदणीसाठी अडचण
सध्या शासकीय धान्य केंद्रावर धान्य विक्रीसाठी नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक करण्यात आला आहे. मात्र, तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तलाठी कार्यलयातील कोटवार शेतकऱ्यांची नावे लिहून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगतो. दुसऱ्या दिवशी शेतकरी जातात तर तलाठी आलेच नाही असे म्हणून शेतकऱ्यांना परत पाठवीले जाते. या प्रकारामुळे शेतकरी त्रासून गेले आहेत.
.........
या कागदपत्रांसाठी पायपीट
सातबारा, उत्पन्नाचा दाखला, गाव नमुना आठ आदी कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांकडून प्रती कागद २० रुपये वसुली केली जात असून, त्याची कसलीही पावती देत नाही किंवा कोणत्याही रजिस्टरवर नोंद करीत नाही. असा आरोप वडेगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची अत्यंत गरज आहे; परंतु तलाठी उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील कार्यरत तलाठ्याची त्वरित इतरत्र बदली करण्याची मागणी सुधीर घुटके, भोजराज निमकर, प्रफुल मेंढे, नितेश शहारे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.