आमगाव : गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस आमगाव तालुक्यात झाला. यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे काही कुटुंबांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आश्रय देण्यात आला आहे.संततधार पावसामुळे आमगाव ते कामठा, सालेकसा, देवरी, तिगाव मार्ग पूर्णत: बंद पडले आहे. या मार्गावरील पुलावर चार फूट पाणी वाहत आहे. तालुक्यातील बनगाव श्रावणटोली, गणेशघाट या गावातील ३५ कुटुंबियांना पुराचा वेढा पडल्याने प्रशासनाने त्या कुटुंबियांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आश्रय दिला आहे. त्यांच्या निवाऱ्याची सोय पोलीस प्रशासन, तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केली आहे.तालुक्यात मंगळवारी सकाळीपर्यंत १६३.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आमगाव शहरातील विविध लोकवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेण्यासाठी भाग पडले आहे. पावसाने साचलेल्या पाणी घरात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. तालुक्यातील श्रावणटोली, गणेशघाट, शंभुटोला, सरकारटोला, महारीटोला, ननसरी, पिपरटोला, सावंगी या गावांना पुराचा धोका असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी )
आमगावात तालुका पूरग्रस्त
By admin | Published: July 23, 2014 12:04 AM