गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असून, बाधितांची संख्या पूर्वीच्या तुलनेत बरीच कमी झाली आहे. मात्र, यानंतरही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचे चित्र आहे. कारण, सोमवारी (दि. ११) कोरोनामुळे आणखी एका रुग्णाला जिवाला मुकावे लागले असून, त्यानंतर आता तालुक्याने शंभरी गाठली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १८० एवढी झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ९२८ एवढी झाली असून, २५३ रुग्ण अद्याप क्रियाशील आहेत. पूर्वीच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी झालेली दिसत असतानाच मात्र दररोज रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यातून कोरोना पूर्णपणे संपलेला नसल्याचे दाखवून देत आहे. मृतांची संख्याही सोबतच वाढत चालली असून, सोमवारी आणखी एका रुग्णाचा जीव कोरोनाने घेतला आहे. यानंतर आता गोंदिया तालुक्यातील कोरोना मृतांची संख्या १०० झाली आहे, तर जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १८० झाली आहे.
-------------------------------
उपाययोजनांची गरज संपलेली नाही
जिल्ह्यात कोरोनाचा कहर नक्कीच कमी झाला आहे हे टाळता येणार नाही. मात्र, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही हे सुद्धा तेवढेच खरे आहे. हेच कारण आहे की, दररोज कोरोनाबाधितांची व मृतांची आकडेवारी वाढतच चालली असून, गोंदिया तालुक्याने सोमवारी शंभरी गाठली आहे. यावरून आता कोरोना नाही या भ्रमात राहून वागणे धोक्याचे ठरणार असून, उपाययोजनांची गरज संपलेली नसून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे हे दिसून येत आहे.