सालेकसा : शिक्षण विभाग व पंचायत समिती सालेकसा गट साधन केंद्र व सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी द्वारा तंबाखूमुक्त शाळा अभियान तालुक्यात व जिल्ह्यात राबविले जात आहे. या अंतर्गत सालेकसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे, मास्टर ट्रेनर व विषय तज्ज्ञ सुरेंद्रकुमार खोब्रागडे व सर्व १० केंद्राचे केंद्र प्रमुख यांनी मेहनत घेऊन सालेकसा तालुक्यातील एकूण १५० प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. त्यामुळे तालुका तंबाखूमुक्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या १० फेब्रुवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार सर्वच शाळा तंबाखूमुक्त करायच्या होत्या, त्यासाठी नऊ निकष निर्धारित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सालेकसा तालुक्याने तंबाखू मुक्तीचे सर्वच नऊ निकष पूर्ण करून तालुका तंबाखूमुक्त करण्यात यश मिळविले आहे. याकरिता गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे व सुरेंद्रकुमार खोब्रागडे, विषय तज्ज्ञ तसेच आरोग्य प्रबोधिनीचे डॉ.सूर्यप्रकाश गभने, सलाम मुंबई फाउंडेशनचे संदेश देवरुखकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून वारंवार मदत केली. गटशिक्षणाधिकारी वाघमारे, विषय तज्ज्ञ खोब्रागडे,गटसमन्वयक बी.डी. चौधरी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कछवे यांनी कौतुक केले आहे.