तंटामुक्त समितीचा उपक्रम : जिल्ह्यात झाले २०० आंतरजातीय विवाहगोंदिया : गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली. तंटे सोडविण्याबरोबर गावात जातीय सलोखा राखून सर्वधर्म समभावाच्या संकल्पनेला पुढे नेत आंतरजातीय व प्रेम विवाह घडवून आणले. जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह झाले. या जोडप्यांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ द्यावे, अशी मागणी पद्मपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषाच्या जयंती, पुण्यतिथी या पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडून प्रेमी युगलाचे शुभमंगल घडवून आणले. सोबतच जिल्ह्यातील ५५६ तंटामुक्त गाव समित्यांनी २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह घडवून आणले. या जोडप्यांना शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ मिळाला नाही, अशी समित्यांची ओरड आहे. मात्र त्या जोडप्यांनी प्रोत्साहन राशीसाठी अर्जच केले नाही. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे किंवा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी हा विवाह लावून देण्याबरोबरच त्या जोडप्यांचे कागदपत्र समाजकल्याण कार्यालयात रितसर अर्जासह दाखल करावे, त्या जोडप्यांना निश्चितच आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहन राशीचा लाभ मिळेल. आंतरजातीय विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती मागास प्रवर्गातील असावा. त्यापैकी एक व्यक्ती जिल्ह्यातील रहिवाशी असावा. (तालुका प्रतिनिधी)समित्यांना मार्गदर्शन करावेशासनातर्फे शुभमंगल योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळयात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांना शासनातर्फे १० हजार रुपये प्रोत्साहन राशी दिली जाते. मात्र महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी लग्न लावलेल्या जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत संस्थेमार्फत विवाह केल्यास शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र तंटामुक्त समित्यांनी लावलेल्या लग्नातील जोडप्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागते. शासनाने सुरू केलेली तंटामुक्त मोहीम प्रत्येक गावात राबवित असल्याने तंटामुक्त मोहीम ही एक शासनाची चळवळ असून या समितीने लावलेल्या लग्नातील जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच आंतरजातिय विवाहाचे प्रस्ताव कसे सादर करावे, यासंदर्भात समाज कल्याण विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी पदमपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.
तंमुसने लग्न लावलेल्या जोडप्यांना आंतरजातीय विवाहाचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2017 12:53 AM