गोंदिया : कोरोनाच्या संकट काळात शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील बऱ्याच भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.
मागील तीन दिवसांपासून नळाचे पाणी आलेच नसल्याने शहरातील बहुतांशी भागांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, अपुऱ्या टँकरमुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. गोंदियात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बऱ्याच भागांत कंटेन्मेंट झोन आहे. त्यात पाणीटंचाई असल्याने या भागातील नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पहाटेपासून महिलांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील विहिरी व बोअरवेल असून, पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नगर परिषदेने या समस्येकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.