कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता पावसाळा जवळच असल्याने शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यांतर्गत गोंदिया नगर परिषदेला यंदा ४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. १ जुलैपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू होणार असून यासाठी नगर परिषदेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बदलते वातावरण हे त्याचे सूचक आहेत. अशात पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. वृक्ष लागवडीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे.यंदा शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यांतर्गत नगर विकास विभागाकडून ‘अ’ वर्ग नगर परिषदांना १० हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार गोंदिया नगर परिषदेला १० हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला एकूण ४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे.िदलेल्या टार्गेटच्या पूर्ततेसाठी आता नगर परिषदेकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हे अंदाजपत्रक तांत्रीक मंजुरीसाठी सामाजीक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांची मंजुरी मिळताच वृक्ष लागवडीचे हे काम खाजगी एजन्सीला देण्याची नगर परिषदेची तयारी असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास, संबंधीत एजन्सीला वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत संबंधीत संपूर्ण कामे करावी लागणार आहे. शिवाय पुढील तीन वर्ष वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही दिली जाणार आहे.येत्या १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने नगर परिषद तयारीला लागली आहे.फळ प्रजातीय वृक्षांची लागवड करानगर परिषदेला देण्यात आलेल्या टार्गेटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ३५ हजार वृक्ष लागवडीची भर घालून टार्गेट वाढवून दिले आहे. शिवाय या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषदेला कडूनिंब, काटेसावर, बेळ, जांभूळ, बेहळा, मोहा, चिंच, आंबा, पिंपळ, हिरडा, चारोळी, बोर, टेंभरून, हिरनी, रीठा, हिवस, पाखड, कटूंबर, शेवगा, अंजन आदि फळ व छायादार वृक्षांच्या लागवडीचे निर्देश देण्यात आले आहे. नगर परिषदेने यंदाचे टार्गेट उत्तमरित्या सर केल्यास येणाऱ्या काळात गोंदिया शहरात नक्कीच हिरवळ दिसणार यात शंका नाही.वृक्ष लागवड कार्यक्रमाला आचारसंहितेचा खोडानगर विकास विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार नगर परिषदेला वृक्षारोपणासाठी ३१ मे पर्यंत खड्डे तयार करायचे होते. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे नगर परिषदेला वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी निविदा प्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे काम करण्यासाठी एजन्सीची निवड अद्यापही झालेली नाही. आता आचार संहिता संपताच निविदा प्रक्रिया केली जाणार व त्यानंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 9:57 PM
पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता पावसाळा जवळच असल्याने शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेची कसरत : १ जुलैपासून वृक्ष लागवड कार्यक्रम