नरेश रहिले
गोंदिया : जिल्हा हागणदारी मुक्त झाला. आता जिल्हा 'ओडीएफ प्लस ' करण्यावर शासनाचा भर आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्यात आले आहे. यात तिरोडा तालुक्यातील पांजरा व नवेझरी, गोरेगाव तालुक्यातील बबई व कटंगी बु. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध यांचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे 'ओडीएफ प्लस' होणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. शासनाने सार्वजनिक स्वच्छता तथा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. त्यासाठी गावातील बाजार क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणात तरंगत्या लोकसंख्येसाठी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, शासकीय कार्यालयात शौचालयांची व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व घनकचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, गावात उपयुक्त घंटागाडीची व्यवस्था, शाळा व अंगणवाडी अंतर्गत शौचालय तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पांजरा, नवेझरी, बबई, कटंगी बु., सिरेगाव बांध आदी गावांत सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या गावांची तपासणी करून गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. गावांची तपासणी केल्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर तशी नोंद करण्यात आली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे हागणदारीमुक्त करण्याचे जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
....................
सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करा
येत्या मार्चपर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा 'ओडीएफ प्लस ' घोषित केला जाणार आहे. गावात शाश्वत स्वच्छता राहावी म्हणून नागरिकांनी सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी, शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर कुणीही शौचास जाऊ नये, इतरांनाही उघड्यावर शौचास बसण्यापासून परावृत्त करावे, सरपंच-ग्रामसेवकांनी सुध्दा गावातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी केले.