वनविभागाची दबंगगिरी : १० गरीब परिवार बेघर, पक्की घरे अतिक्रमणातच देवरी : शहराला लागून असलेल्या धोबीसराड गावातील गट क्र. १८८ मध्ये मागील सहा वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या गरीबांची घरे शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडली. त्यामुळे लोकांमध्ये वनविभागाच्या अन्यायपूर्ण व भेदभावपूर्ण कारवाईबद्दल संतापाचे वातावरण तयार झाले. वनविभाग देवरी कार्यालयात नव्याने रुजू झालेले वनपरीक्षेत्राधिकारी भगवान मारबते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी गट नं.१८८ मध्ये लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे सांगून शुक्रवारी कारवाई करीत १० घरे तोडली. यामुळे या १० परिवारातील ५० लोकांना उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. ज्यांची घरे तोडण्यात आली त्यांनी या कारवाईला अन्यायकारक सांगितले व पक्या घरांवर वनविभाग कारवाई करणार का? असा संतप्त सवाल केला आहे. विशेष म्हणजे या गट क्र.१८८ मध्ये एकूण ८.२० हेक्टर जमीन येते. बऱ्याच वर्षापासून ही वनजमीन रिकामी पडून होती. या जमिनीवर काही लोकांनी कच्ची-पक्की घरे बनविली. काहींनी या जमिनीवर शेतीसुद्धा काढली. परंतु इतक्या वर्षापासून वनविभाग गप्प होता. आता एकाएकी कारवाई करुन वनविभागाने गरीबांची घरे तोडली व शेकडो पक्क्या घरांवर कारवाई करण्याचे टाळले.त्यामुळे वनविभाबद्दल रोष व्यक्त होत आहे. वनविभागाद्वारे झालेल्या अतिक्रमण हटावच्या कारवाईत रामरतन नागवंशी, बाळू आंबेडारे, सुनिता नेवारे, शारदा वालदे, दुर्गा नेताम, पंढरी गेडाम, लखन राऊत, संतोष वाघ, सावित्री दंदे यांची घरे पोलीस संरक्षणात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडली. विशेष म्हणजे यामध्ये विधवा महिला सुनिता अजित नेवारे हिच्या घरावर ग्रामपंचायतने टॅक्स लावलेला आहे. तरी सुद्धा तिचे घर तोडण्यात आले. तिला दोन लहान मुले आहेत. ती उघड्यावर आली आहेत. कारवाई निर्दयीपणे करण्यात आली. या भेदभावपूर्ण कारवाईबाबत वनपरीक्षेत्राधिकारी भगवान मारबते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गट नं. १८८ ही वनजमिन असून जी पक्के घर आहेत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. नियमाप्रमाणे त्यांचेवर सुद्धा कारवाही होणार. (तालुका प्रतिनिधी)
ग्रा.पं.चा टॅक्स लागलेली घरे भुईसपाट
By admin | Published: January 28, 2017 12:29 AM