लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने विरोधकांच्या विरोधानंतरही अन्यायकारक तीन कृषी विधेयक पारित केली. यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र हे आंदोलन सुध्दा दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.८) येथे केले. केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणाच्या विरोधात मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला महाविकास आघाडीने समर्थन दिले होते. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने सकाळी शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन, अमर वऱ्हाडे, जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेनेचे पंकज यादव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयूर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, निलम हलमारे, देवेंद्रनाथ चौबे, गोविंद तुरकर, पंकज यादव, आशा पाटील, शिवकुमार शर्मा, के.बी.चव्हान, केतन तुरकर, सौरभ रोकडे, सतीश देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात आ.सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले.