देवरी : केंद्रातील मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. चुलीच्या धुराचा त्रास महिलांना होतो, असे म्हणून व अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता बळकावली. घरगुती गॅसच्या किमती हजारच्या जवळपास वाढवून महिलांचे जीणे कठीण केले आहे. जनतेला महागाईच्या खाईत लोटले. त्यामुळे अशांना धडा शिकविण्याचे आवाहन आ. सहषराम कोरोटे यांनी केले.
देवरी येथील सीताराम लॉन्स येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि.२३) रोजी आयोजित तालुकास्तरीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, माजी अध्यक्ष राधेश्याम बगडिया, माजी जि.प.सदस्य घासीलाल कटकवार, तालुका महिला अध्यक्ष सुभद्रा अगडे, सरपंच कविता वालदे, भारती सलामे, सय्यद, माणिकबापू आचले, सोनू नेताम, ओमप्रकाश रामटेके, माजी पं.स.सदस्य जगत नेताम उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची धुरा ही कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच असते, त्यामुळे सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही आ.कोरोटे यांनी दिली. देवरी नगर पंचायतच्या एकूण १७ वाॅर्डातील पक्ष अध्यक्षाची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक संदीप भाटिया यांनी मांडले.